अमोल धर्माधिकारी, पुणे
आज गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे. बाप्पाचं आगमन हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतात. आनंदाने गणपती बाप्पाचे वाजत- गाजत स्वागत करतात.
ढोल ताशा, फटाके, अगदी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वजण स्वागत करतात. सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. तसेच लाडक्या बाप्पाची आज घरोघरी मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा केली जाते. अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. यंदा सुबोध भावे यांच्या कुटुंबाकडून काश्मीर येथील गंडोला केबलकारचं डेकोरेशन साकारण्यात आलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना सुबोध भावे म्हणाले की, आम्ही यावर्षीच काश्मीरला जाऊन आलो आणि तिकडे त्या गंडोल्यामध्ये बसलो होतो. फारच सुंदर आहे काश्मीर त्याची आठवण म्हणून हा गंडोला केला आहे. गणपतीचा उत्सव कायम उर्जा आणि उत्साह घेऊन येतो समाजात. नवीन कामासाठी प्रेरणा घेऊन येतो. कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्याला वंदन करुन करत असतो.
त्यामुळे एवढीच प्रार्थना आहे की, सुख, समाधान, शांती, पाऊस झालेला आहे तरीसुद्धा धरणं सगळी महाराष्ट्रातली भरुदे, शेतकऱ्यांना उदंड पाणी मिळू दे. त्यांची पीकं उभी राहू दे. ज्यानेकरुन त्यांच्या हातात पैसे येतील, त्यांच्या शेतीसाठी त्यांना ताकद मिळेल. ही ताकद त्यांना मिळू दे आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, शांतता, सुख, समाधान नांदू दे. असे सुबोध भावे म्हणाले.